...म्हणून राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बोलबाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचीच चर्चा
अमित जोशी, मुंबई : राजकारणात सध्या एका नावाचा प्रचंड बोलबाला आहे. युतीची विस्कटलेली घडी पुन्हा कशी बसणार, असा मोठा प्रश्न असताना वाजत गाजत युती तर झालीच. पण त्याहीपुढे जाऊन नाराजांना आपलंसं करुन, अनेकांना पक्षात आणून सगळ्यांची तोंडं त्यांनी बंद करुन टाकली. सध्या राज्यातल्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार चर्चा आहे. अगदी युतीची घडी पुन्हा बसवण्यापासून ते नाराजांना आपलंसं करण्यात सध्या जादूची छडी कुणाकडे असेल कर की मुख्यमंत्र्यांकडेच दिसते आहे.
- युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत मातोश्री वारी केली.
- ३ दिवसांत युतीची घोषणा झाली.
- नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केला.
- महामंडळ वाटप करत शिवसेनेला खुश केलं.
- सुजय विखे पाटील, मदन भोसले यांच्या भाजप पक्षप्रवेशाने काँग्रेसला धक्का दिला.
- शिवसेना-भाजप संयुक्त सभा ठरवण्यासाठी पुन्हा मातोश्रीवारी केली.
- तिकडे खडसेंसारख्या नाराजांनाही आपलंसं केलं.
- खोतकरांसारखी बंड शांत केली.
- आचारसंहितेआधी मुंबईची मोनो, नागपूर मेट्रो, परळ टर्मिनसचं उद्घाटन करुन धडाका लावला.
हे सगळं पुढाकार घेऊन करतानाही अगदी सहज घडल्याचं मुख्यमंत्री भासवत राहिले. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठा मोर्चा, धनगर मोर्चा, अण्णांचं उपोषण अशी अनेक आंदोलनं झाली. पण कुठली कळ कुठे कशी दाबायची हे मुख्यमंत्र्यांना अचूक कळलं आहे. दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेनं भाजपवर टीका करुन रान उठवण्याचा प्रयत्न केला. पण आता महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटावर मुख्यमंत्र्यांचाच बोलबाला आहे.
एवढंच नाही तर माढामध्ये गेले अनेक महिने केलेली पक्ष बांधणी, शेतकरी संबंधित निर्णय आणि कामं यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ भाजपाल अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या माघारीसाठी हेही एक कारण असल्याचं बोललं जातं आहे. निर्णय घेण्याची क्षमता, माणसांना सांभाळण्याची हातोटी आणि कामाचा वेग पाहता देवेंद्र फडणवीसांसाठी राजकीय मार्ग प्रशस्त झाल्याचं दिसतं आहे.