मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आज देशभरातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. दादरच्या चैत्यभूमीवर लाखो भीम अनुयायांनी बाबासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलीय. सकाळी आठच्या सुमारास राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्य़भूमीवर जाऊन घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी मंत्रिमंडळातले अनेक मंत्री त्यांच्यासोबत होते. बाबासाहेबांच्या समतेच्या शिकवणीची आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी करून दिली. बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारेच आपला देश जगातल्या सर्वोच्च स्थानी पोहेचल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, महामानव ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत डॉ आंबेडकर विचार महोत्सव समिती आणि तालविहार संस्थ्येच्या वतीनं भिमांजली या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमात आपली हजेरी लावत आहेत. बाबासाहेब स्वतः शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. १८-१८ तास अभ्यासात घालवल्यावर त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे स्वर नेहमी भुरळ घालत. याच आठवणीचा धागा घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 


दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने लोकल गाडयांना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था केलेली आहे. अनुयायांच्या सोयीसाठी खास तिकिट खिडक्या, गर्दी नियंत्रित करण्यासाठी आरपीएफ-जीआरपीच्या जवानांची नियुक्ती केलेली आहे. दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या अनुयायांना चैत्यभूमी आणि पॅगोडाला जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी चर्चगेट, दादर, अंधेरी, माहीम आणि बोरीवली स्थानकांवर मदत कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.