`सामान्य दिसणाऱ्या पर्रिकरांमधील असामान्य नेता पाहून अनेकजण आश्चर्यचकित व्हायचे`
मनोहर पर्रिकर यांनी राजकारणात स्वत:ची एक वेगळी ओळख प्रस्थापित केली होती.
मुंबई: मनोहर पर्रिकर दिसायला साधे असले तरी नेता म्हणून ते इतके असामान्य कसे काय असू शकतात, याचे अनेकांना आश्चर्य वाटायचे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी केंद्रीय संरक्षणमंत्री असलेल्या पर्रिकर यांचे रविवारी रात्री पणजी येथे निधन झाले. त्यांच्या जाण्याने देशाने एक साधा, सच्चा आणि स्वच्छ चारित्र्याचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मनोहर पर्रिकर यांनी राजकारणात स्वत:ची एक वेगळी ओळख प्रस्थापित केली होती. ज्यावेळी गोव्यात आयाराम-गयाराम संस्कृती आणि भ्रष्टाचार माजलेला होता तेव्हा पर्रिकर यांनी गोव्यात प्रामाणिक आणि पारदर्शक सरकार दिले. पंतप्रधान मोदी यांनी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यावरही त्यांनी मोठ्या तडफेने आणि हिंमतीने काम केले. दिसायला सामान्य असणाऱ्या पर्रिकरांमध्ये नेता म्हणून असलेले असामान्यपण पाहून लोकांना आश्चर्य वाटायचे. त्यांच्या स्वभावात कोणताही बडेजाव नव्हता. त्यामुळेच ते सामान्य लोकांना आपलेसे वाटायचे. पर्रिकरांच्या जाण्याने देश आणि भाजपची खूप मोठी हानी झाली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
२००० मध्ये पर्रिकर सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले. सामान्य गोवेकरांचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती. ते स्कूटीवरून मुख्यमंत्री कार्यालयात जायचे. स्कूटीवरून जातानाचे पर्रिकरांचे अनेक फोटो तेव्हा व्हायरल झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरही पर्रिकर पणजीतील शासकीय निवासस्थानी न राहता म्हापसा येथील वडलोपार्जित घरात राहायचे.
स्वच्छ प्रतिमा आणि साध्या राहणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पर्रिकर यांनी २००० ते २००५, २०१२ ते २०१४ आणि १४ मार्च २०१७ पासून निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्याची धुरा सांभाळली. २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले.