दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड १५ मिनिटे झालेल्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे हे शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी आज रात्री भेट घेणार होते. उद्धव ठाकरे शिष्टमंडळासह या भेटीसाठी वर्षावर पोहचलेही, मात्र नाणार प्रकल्पाबाबत चर्चा सुरू होण्यापूर्वी ठाकरे आणि फडणवीस यांची १५ मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली.


जाहीर सभांमधून मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणा-या उद्धव ठाकरेंनी बंद दाराआड काय चर्चा केली असावी असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दुसरीकडे शिवसेनेने नुकतीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर शिवसेनेने हा निर्णय बदलावा, आगामी निवडणुकांमध्ये भाजपाबरोबर युती करावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.


या चर्चेच्या पार्श्वभूमीवरही या बंद दाराआडील चर्चेकडे बघितले जातेय. भाजपाने शिवसेनेसमोर विधानसभा निवडणुकीसाठी १४० जागांचा प्रस्ताव ठेवल्याचीही चर्चा होती. त्यामुळे याबाबत या बैठकीत काही चर्चा झाली का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसंच बंद दाराआड चर्चा झाल्याने शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेचे काय होणार असेही विचारले जात आहे.