`बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांनी शिकवू नये` मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
राज्यपालांच्या वक्तव्यावर Uddhav Thackeray यांचा महाराष्ट्र बंदचा इशारा, तर CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
CM Eknath Shinde : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वेळ पडल्यास महाराष्ट्र बंदचही (Maharashtra Band) हाक देऊ, असा इशारा दिला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे.
या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं भाजप-शिवसेना सरकार (Shinde-Fadanvis Government) काम करत आहे, त्यामुळे काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, छातीत धडकी भरली आहे. त्यातूनच असे प्रकार पुढे येत असल्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकणाऱ्यांना नाहीत, सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि तडजोड केली, त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं.
मंदिरात जाण्यासाठी अडथळा नाही
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर हे सरकार स्थापन करण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही मंदिरात जाण्याचा आम्हाला अडथळा वाटत नाही, आम्ही जे करतो ते उघडपणे करतो. दिवसाढवळ्या करतो, काही लोकं लपून छपून करतात असा टोलाही मुख्यमंत्र्यांना लगावला.
ज्यांना हात दाखवायचा होता तो...
आत्मविश्वासाला धक्का लागलेली व्यक्ती ज्योतिषाकडे जाते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) केली होती. याला उत्तर देताना आत्मविश्वास होता, म्हणून 50 आमदारांसोबत 13 खासदार माझ्यासोबत आले, मविआ सरकार कोणाचं काम करत होतं, हे सर्वसामान्यांना मान्य नव्हतं, म्हणून सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलेलं आहे. हात दाखवायचा जो विषय आहे तो 3 जूनला आम्ही ज्यांना दाखवायचा होता तो दाखवला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रातील एक इंचही जागा देणार नाही
गेल्या अडीच वर्षात मविआ सरकारने काय केलं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात मी चाळीस दिवस जेल भोगून आलो आहे, तुम्हाला आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही. सीमावर्ती भागात गेल्या अडीच वर्षात ज्या योजना बंद करण्यात आल्या होत्या, त्या आम्ही सुरु केल्या. सीमावर्ती भागातील मराठी माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करतोय, महाराष्ट्रातील एक इंचही जागा कुठे जाऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.