Ekanth Shidne Group : दादरमध्येच उभं राहणार शिंदेंचं `सेना भवन`, शाखाही उभारणार
उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Cm Eknath Shinde) नवा मास्टर प्लॅन तयार केलाय.
मुंबई : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Cm Eknath Shinde) नवा मास्टर प्लॅन तयार केलाय. आपणच खरी शिवसेना (Shiv Sena) आहोत, असा दावा शिंदे गटानं आधीच केलाय. आता नवं शिवसेना भवन (Shiv Sena) उभारण्याची तयारी शिंदेंनी सुरू केलीय. कुठं आणि कसं असेल हे नवं सेना भवन? पाहूयात हा खास रिपोर्ट. (cm eknath shinde build new shiv sena bhavan also party shakha)
शिवसेना भवन, शिवसेनेचं मुंबईतलं मध्यवर्ती कार्यालय. इथूनच शिवसेनेचा संघटनात्मक कारभार चालतो. तीच ही ऐतिहासिक वास्तू. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पदस्पर्शानं पावन झालेली इमारत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना भवनाची ही दिमाखदार वास्तू कुणाच्या ताब्यात जाणार? या वास्तूवरही शिंदे गट दावा ठोकणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे गटानं आता वेगळाच मास्टर प्लॅन आखलाय. सध्याचं शिवसेना भवन ताब्यात घेण्याऐवजी दादरमध्येच नवं शिवसेना भवन उभारण्याचा निर्धार शिंदे गटानं केलाय.
शिंदेंनी केवळ शिवसेना भवनच नव्हे तर शाखांबाबतही मोठा प्लॅन तयार केलाय. कारण प्रत्येक शाखा ही शिवसेनेची खरी ओळख. शाखाशाखांच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचं जाळं महाराष्ट्रभर पसरवलं.
तोच पॅटर्न आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटही राबवणार आहे. आपली पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मुंबईतील सर्वच भागात शिंदे गटाच्या स्वतंत्र शाखाही सुरू करण्यात येणार आहेत. नव्या शाखाप्रमुखांच्या तसंच विभागप्रमुखांच्या नेमणुकाही लवकरच करण्यात येणार आहेत.
दरम्यान, काही माणसं मुर्खांच्या नंदनवनात वावरत असतात, अशा शब्दांत शिवसेनेनं शिंदे गटाच्या शिवसेना भवन उभारण्याच्या मास्टर प्लॅनची खिल्ली उडवलीय.
खरी शिवसेना कुणाची, हा वाद सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे विरुद्ध शिंदे गटाची लढाई सुरू आहे. आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना आणखी जोर का झटका देण्याची तयारी शिंदे गटानं चालवलीय.
नवं शिवसेना भवन हा त्याच रणनीतीचा महत्त्वाचा भाग असणाराय. मात्र हे शिंदेंच सेनाभवन ठाकरेंच्या सेनाभवनासमोर असणार की आणखी कुठे याबाबत मात्र सर्वांनाच उत्सुकता आहे.