मुंबई : नॉन ब्रँडेड अन्नधान्य आणि खाद्यपदार्थावर नव्याने लावलेल्या पाच टक्के जीएसटी (GST) संबंधात केंद्र सरकारकडे हा कर रद्द करण्यासाठी पाठपुरावा करू अस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अग्रिकल्चर या राज्याच्या व्यापार, उद्योग कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष  ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नवीन लावण्यात आलेल्या जीएसटी मुळे राज्यातील सामान्य जनतेबरोबर व्यापाऱ्यांच्या मध्ये असलेल्या तीव्र भावनांची माहिती दिली.  हा कर रद्द होण्याची आवश्यकता असल्याची मागणी ललित गांधी यांनी केली.


मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी व्यापारी आणि जनतेच्या भावनांशी आम्ही सहमत असून हा कर रद्द करावा यासाठी राज्य सरकार केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करेल अशी ग्वाही दिली. 


तसंच व्यापार, उद्योग क्षेत्राच्या विविध प्रश्नां संबंधी चेंबर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळा समवेत लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करू असं आश्वासनही  मुख्यमंत्र्यांनी दिलं.


यावेळी उपस्थित शिष्टमंडळात संदीप भंडारी,आशिष नहार, निरव देडिया, विकास अच्छा, दीपक मेहता, सागर नागरे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.


महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधींनी या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेली चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचे सांगून राज्य शासन याविषयी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याने याविषयी समाधानकारक तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली.