Maharashtra Politics : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चारही बाजूंनी कोंडी करण्याचा चंगच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) बांधलाय.  शिवसेनेचे (Shivsena) 40 आमदार आणि 12 खासदार फोडल्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा वळवलाय तो ज्येष्ठ नेत्यांकडे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेब ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांना आपल्या गटात सामील करण्यासाठी शिंदेंनी खास रणनीती आखलीय. त्याच रणनीतीनुसार शिंदेंनी गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे.


ज्येष्ठ नेते गळाला लागणार?
गेल्या आठवड्यात शिंदेंनी शस्त्रक्रिया झालेले खासदार गजानन किर्तीकरांची भेट घेतली. बुधवारी रामदास कदम यांच्या निवासस्थानी जाऊन शिंदेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गुरुवारी सकाळी त्यांनी लीलाधर डाकेंची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तर गुरूवारी संध्याकाळी त्यांनी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशींची भेट घेतली.


शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर एकनाथ शिंदेंनी दावा केला आहे. शिवसेना नेमकी कुणाची, हा वाद सध्या सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगापुढं प्रलंबित आहे.


ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी कशासाठी? 
कायद्यानुसार आमदार-खासदारांसोबत मूळ पक्षातही उभी फूट पडावी लागते. कोर्टात शिवसेनेची घटना आणि राष्ट्रीय कार्यकारिणी हे दोन घटक निर्णायक ठरू शकतात. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सध्या 15 सदस्य आहेत. त्यापैकी एकनाथ शिंदे, आनंदराव अडसूळ, रामदास कदम या तिघांची उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी केलीय. सुधीर जोशी यांचं निधन झालंय.  तर सुभाष देसाई, मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, आदित्य ठाकरे, गजानन कीर्तीकर, संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे हे सध्या उद्धव ठाकरेंसोबत आहेत.


त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेनेच्या वाढीसाठी झटलेल्या पहिल्या फळीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यामागं काय कारण आहे? हे वेगळं सांगायलाच नको. राष्ट्रीय कार्यकारिणीतही दोन तृतियांश सदस्य फुटल्याचं सिद्ध केल्यास शिंदेंना शिवसेनेवर ताबा मिळवता येईल. त्यासाठीच शिंदे कंबर कसून कामाला लागलेत.