Eknath Shinde Sharad Pawar Meeting Adani Connection: मुंबईच नाही तर राज्याच्या राजकारणामध्ये धारावी पुनर्विकासचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एकीकडे महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गटाने सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धारावी पुनर्विकासाच्या धोरणाला विरोध केला आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शरद पवार गटाचे प्रमुख आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी या संदर्भातील भूमिका अद्याप जाहीरपणे स्पष्ट केलेली नाही. असं असतानाच काही दिवसांपूर्वी झालेल्या पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान अदानी समुहातील तीन अधिकारी धारावी पुनर्विकाससंदर्भातील चर्चेसाठी उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. याचबद्दल आता उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या 10 दिवसांच्या अंतरावर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोनदा एकमेकांना भेटले. या बैठकीमागचं नेमकं सत्य काय? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेला. त्यातच पवार- शिंदे भेटीचं अदानी कनेक्शन समोर आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, पवार आणि शिंदे यांच्या भेटीदरम्यान उद्योगजक गौतम अदानी यांच्या समुहाचे धारावी पुनर्वसन प्रकल्पाशी संलग्न तीन बड्या अधिकारीही 'वर्षा' बंगल्यावर उपस्थित होते. या भेटीमध्ये मुंबईतील धारावी पुनर्वसनाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं याच संबंधी या अधिकाऱ्यांची उपस्थिती असू शकते असा तर्क लावला जात आहे.


ठाकरे काय म्हणाले?


तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेमध्ये या भेटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, "त्या बैठकीत मी तर नव्हतो. त्याबद्दल पवार साहेबच बोलू शकतील," असं उत्तर दिलं. यावर पत्रकारांनी, "पवार साहेबांनी अदानींबद्दल भूमिका स्पष्ट करावी अशी आपली मागणी आहे का?" असा सवाल उद्धव ठाकरेंना केला. "हे बघा, कोणाची भूमिका काय असावी यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे. मी धारावीकरांच्या विकासाच्या आड आलेलो नाही. धारावीकरांना तिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.


मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही


"धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवून एका धारावीच्या 20 धाव्या करण्याचा आताचा जो डाव मिंधे सरकार अदानींच्या माध्यमातून करत आहे ते आम्ही होऊ देणार नाही. मुंबईची विल्हेवाट आम्ही कोणीच लावू देणार नाही. जे धारावीकरांना तिथेच घरं मिळाली पाहिजे. त्यांच्या घरामध्ये रोजगार, व्यवसाय आहेत. त्या व्यवसायाची सोय त्या आराखड्यात असावी. धारावीचा आराखडाच झाला नाहीये. त्यामुळे मला भीती वाटतेय की हे लोक धारावीकरांना मीठागरांमध्ये फेकणार. मुलुंड टोलनाका, दहिसर टोल नाका, मदर डेअरी अशा अन्य 20 जागा टेंडरमध्ये नव्हत्या. कोणत्याही विकासकाला मूभा देता येणार नाही. तिथला डीटीआर काढून ते मुंबईत वापरण्याचा अधिकार दिला आहे हे गैर आहे. गैर गोष्टी आम्ही मुंबईत होऊ देणार नाही. त्यांची भूमिका जी काही असेल ती त्यांची त्यांची असू द्या पण शिवसेना मुंबईत हे होऊ देणार नाही," असंही उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडताना सांगितलं.