COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : रवींद्र मराठेच्या अटकेवरून आज सामनामधून मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर खुमासदार टोलेबाजी करण्यात आली. राज ठाकरे आणि पवारांनी कालच मराठेंच्या अटकेविषयी तीव्र शब्दात टीका केली होती. आज सामनामधून मुख्यमंत्री आणि विशेषतः गृहखात्याच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. 'मराठे' अटक प्रकरणात गृहखात्याचे पुन्हा तसेच धिंडवडे निघत आहेत. आपले मुख्यमंत्री म्हणजे भोळे सांब आहेत. ते त्यांच्या पक्षाचे निष्ठावान सेवक आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा संपूर्ण वेळ पक्षविस्तारांत, निवडणूक लढवण्यात जात असल्याने त्यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही. याचा गैरफायदा फडणवीसविरोधी गटाने घेतलेला दिसतोय. 


काय म्हटलंय अग्रलेखात 


मुख्यमंत्र्यांची ‘बूंद से गयी वो हौद से नहीं आती’ हे सिद्ध झाले आहे. ‘२६/११’च्या हल्ल्याच्या वेळी ‘कसाब’ घुसला तेव्हा गृहखात्याचे धिंडवडे निघाले. आता ‘मराठे’ अटक प्रकरणात गृहखात्याचे पुन्हा तसेच धिंडवडे निघत आहेत. आपले मुख्यमंत्री म्हणजे भोळे सांब आहेत. ते त्यांच्या पक्षाचे निष्ठावान सेवक आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा संपूर्ण वेळ पक्षविस्तारांत, निवडणूक लढवण्यात जात असल्याने त्यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही. याचा गैरफायदा फडणवीसविरोधी गटाने घेतलेला दिसतोय.


मुख्यमंत्र्यांच्या आसपास अलीकडे संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली दिसत आहेत. दोन-चार खून करून सुटलेले काही लोक भाजपच्या अंतर्गत गोटात घुसले असून त्यांचा वावर मुख्यमंत्र्यांच्या आसपास दिसतो. याबाबत योग्य वेळी फटाके वाजतीलच, पण गृहखात्यात दिवसा पसरलेल्या अंधाराने मुख्यमंत्री गुदमरले आहेत. गृहखात्यातच मुख्यमंत्र्यांविरुद्ध षड्यंत्र रचले जात असेल तर कसे व्हायचे! 


फडणवीसविरोधी गटाने गृहखात्यास वाळवी लावली आहे. त्यामुळेच भीमा-कोरेगाव प्रकरणाने महाराष्ट्र पेटला. याच विरोधी गटाने राज्यातील अबलांवर बलात्कार व खून करायला लावले. या विरोधकांनी लातुरात परवा कोचिंग क्लास मालकाचा खून करायला लावला. नक्षलवाद्यांपेक्षा हे भयंकर असून गृहखात्यातील मुख्यमंत्रीविरोधी घुसखोरांशी कुणाचा संबंध आहे? यावर दानवे, शेलार, खडसे, गडकरी वगैरे मंडळींनी तत्काळ झोत टाकायला हवा. मुख्यमंत्री, काळजी घ्या!