बाळासाहेबांसाठी काय पण, राणे यांनी दिले CM उद्धव ठाकरे यांना हे ओपन चॅलेंज
Balasaheb Thackeray Memorial : राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. आता राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरुन (Balasaheb Thackeray Memorial) मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज दिले आहे.
मुंबई : Balasaheb Thackeray Memorial : केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane) यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारपासून मुंबईतून सुरुवात झाली आहे. या माध्यमातून भाजपकडून शक्तिप्रदर्शन करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले आवाहन आणि शिवसेनेकडून होत असलेला विरोध लक्षात घेऊन भाजपकडून व्युवरचना करण्यात आली. दरम्यान, राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. आता राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरुन (Balasaheb Thackeray Memorial) मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर स्वतःच्या पैशांनी दोन महिन्यात दि्वंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक (Balasaheb Thackeray Memorial) उभारु, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. राणे यांनी जोगेश्वरीत जनआशीर्वाद यात्रेत बोलताना ही घोषणा केली. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रा पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आली आहे. जनतेचे आशीर्वाद घ्या आणि अडचणी समजून घ्या, असे त्यांनी सांगितले. मुंबई विमानतळापासून या यात्रेला सुरुवात झाली. राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर अभिवादन केले. साहेब आज आशीर्वाद द्यायला तुम्ही हवे होतात अशी भावना राणे यांनी यावेळी व्यक्त केली.
स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण
त्याआधी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. त्यानंतर नारायण राणे यांनी याविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना खडे बोलही सुनावले.
दरम्यान, शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. लाचारीतूनच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलविलेल्या विरोधकांच्या बैठकीला उपस्थिती लावणार असल्याचे टीकास्त्र त्यांनी यावेळी केले.
राणे यांची पहिली प्रतिक्रिया
मला कोणासमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं, नमस्कार करावासा वाटतो हा माझा प्रश्न आहे. आता त्यात गोमूत्र कोणाला शिंपडायचं शिंपडू द्या, कोणाला प्यायचं त्याला पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध? मला काय विचारता, त्यांना विचारा ना की का शिंपडलं? काय दूषित झालं होते, अशी त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या अवस्थेबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, एवढाच जर स्मारकाबद्दल आदर आहे, तर ते ज्या स्थितीत आहे, त्याकडे लक्ष द्या. मी अनेक स्मारकं पाहिली आहेत, त्याच्या आजूबाजूला सुंदर लॉन असतं, सुशोभीकरण केलेलं असते. झाडं आहेत. इथे काय आहे? साहेबांचा फोटोही नीट दिसत नाही. जे गोमूत्र शिंपडायला आले ना, त्यांनी ते स्मारक जागतिक किर्तीचं कसं होईल याकडेही पाहावं, हेच माझं त्यांना उत्तर आहे. स्मारकाचं शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी मन शुद्ध करा, असे राणे म्हणाले.