मुंबई : काळबादेवी परिसरातल्या सुवर्ण कारागिरांनी त्यांचे व्यवसाय स्थलांतरीत करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्निसुरक्षेच्या दृष्टीनं काळबादेवी भागातल्या झवेरी बाजारातल्या सुवर्णकारांनी तिथून स्थलांतर करावं. त्यासाठी मुंबई महापालिकेने बैठक घेऊन कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. 


काळबादेवी भागात राहणारे हरकिशन गोरडीया यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा उद्योग स्थलांतर करण्याबाबत संबंधितांना नोटीस देण्याच्या सूचना दिल्यात.


काळबादेवी भागात सुवर्ण कारागिरांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे. सोन्याशी संबंधित जवळपास ४८ हजार व्यवसाय काळबादेवी या भागात आहेत. साहजिकच तिथे भट्ट्या, धुराच्या चिमण्यांची संख्याही जास्त आहे. 


अग्निसुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचं तक्रारकर्ते गोरडिया यांचं म्हणणं आहे. तर 'झवेरी बाजार हा मुंबईतला मुख्य भाग आहे... इथं जवळपास दोन लाख कारागिर काम करतात... एवढ्या सगळ्यांना स्थलांतरित करणं शक्य नाही', असं  सुवर्णकारांच्या संघटनेचे पदाधिकारी कुमार जैन यांनी म्हटलंय.