मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळपास आठ दिवसांपूर्वीच राज्याच लॉकडाऊनची हाक दिली. त्यानंतर सातत्याने राज्यातील जनतेच्या संपर्कात आले. परिस्थितीचं गांभीर्य वेळोवेळी त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अतिशय संवेदनशील अशा वेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेत या प्रसंगी त्यांना साथ देणाऱ्या मित्रपक्षांसोबतच विरोधी पक्षांचे, पक्षनेत्यांचे आणि केंद्र सरकारचे मनापासून आभार मानले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करतेवेळी त्यांनी आपल्या संबोधनपर भाषणाची सुरुवातच सर्वांचे आभार मानत केली. ज्यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्यापासून राज्यातील जनतेचाही उल्लेक केला. अतिशय महत्त्वपूर्ण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांची साथ असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. सोबतच कोरोना विषाणूचा विळखा वाढत असला तरीही त्याच्याशी लढा देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. 


कोरोना विषाणूचं गांभीर्य न जाणता ज्या देशांनी त्यात निष्काळजीपणा दाखवला तेथील परिस्थिती आज दुर्दैवी असल्याचं म्हणत आपण, कठोर पावलं उचलत हे सर्व निर्णय का घेत आहोत याचा अंदाज जनतेला आलाच असावा, असं मत त्यांनी मांडलं. 


सध्याच्या घडीला संपूर्ण देशातील आणि राज्यातील अनेक मजदूर हे त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी निघाले आहेत. पण, त्यांनी आहे त्याच ठिकाणी राहावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. या सर्व मजुरांची, कामगारांची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राहण्याची आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सोय आम्ही करणार असल्याचं ते म्हणाले. 



कोरोनाच्या कठीण प्रसंगी रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना मानाचा मुजरा... 


सध्याच्या घडीला रुग्णांची सेवा करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या सर्व डॉक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवांमध्ये असणाऱ्यांचे मुख्यमंत्यांनी आभार मानले. डॉक्टरांना मानाचा मुजरा करत त्यांनी आपल्या या मंडळींचा अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. 


कामगारांची काळजी घ्या... 


'साखर कारखान्यांना विनंती, कर्मचाऱ्यांची, ऊसतोड कामगारांची काळजी घ्या. एकंदर परिस्थिती पाहता आता आपण सर्व वाहतूक पूर्ण बंद करत आहोत. तुमच्या सोयीसुविधांसाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास सुरु राहणार आहेत. पण, काहीजण मात्र विनाकारण बाहेर पडत आहेत. पोलीसही पूर्ण ताकदीने त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. मी सर्व धर्म, सर्वपक्षीयांना विनंती करतो. अजूनही होणारी वर्दळ ताबडतोब थांबवा. ही आणिबाणी आहे. प्रत्येकाने जबाबदारीने वागा', असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. 


हे दिवसही निघून जातील... 


कोरोनाशी सुरु असणारं हे युद्ध आपल्याला जिंकायचंच आहे, असं म्हणत सध्याचा काळ हा कोरोना विषाणूच्या गुणाकाराचा असला तरीही आपल्याला त्याची वजाबाकीच करायचं आहे, असा दृढ निश्चय त्यांनी व्यक्त केला. हे दिवसही निघून जातील पण, घरात आनंदाने हा वेळ व्यतीत करा, असा सकारात्मक संदेश देत त्यांनी सर्वांनाच कोरोनाशी लढण्याचं बळ दिलं.