मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदी लागू असली तरीही जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीला आडकाठी करू नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलिसांना देण्यात आल्या आहे. मात्र, त्याचवेळी नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारच्या सूचनांचे पालन करावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी म्हटले की, मी काहीही बंद करायला आलेलो नाही. उलटपक्षी आपण करीत असलेल्या सहकार्यासाठी आपले आभार मानायचे आहेत. मात्र, अजूनही सकाळाच्या वेळेत लोक गर्दी करताना दिसत आहेत. जीवनावश्यक वस्तू , दूध किंवा भाजीपाला घेण्यासाठी लोक बाहेर पडतात, ही बाब मला मान्य आहे. त्यामुळे  याची खातरजमा करूनच लोकांना अडवावे, असे निर्देश मी पोलिसांना दिल्याचे उद्धव यांनी सांगितले.


सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या असल्या तरी शेतमाल, अन्नधान्याची वाहतूक, संबधित कामगार वर्गाची ने-आण करणारी वाहने अडवू नयेत, असेही पोलिसांना सांगण्यात आले आहे. मात्र, कंपन्यांनीही आपल्या वाहनांवर कंपनीचे स्टीकर लावावे. तसेच कर्मचाऱ्यांनी स्वत:कडे ओळखपत्रे बाळगावीत. जेणेकरून वाहतुकीत कोणताही अडथळा येणार नाही, असे उद्धव ठाकरे  यांनी सांगितले.


तसेच मुंबईत मास्कचा मोठा साठा जप्त केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी पोलिसांचे कौतुक केले. संकटाच्या काळात व्यापाऱ्यांनी फायदा उठवण्याचा प्रयत्न करू नये, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


याशिवाय, उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचेही आभार मानले. आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आयकर परतावा आणि जीएसटी भरण्याची मुदत वाढवल्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचे उद्धव यांनी सांगितले.