मुंबईची लाईफलाईन सुरु करा; शरद पवार, उद्धव ठाकरे रेल्वेमंत्र्यांशी बोलणार
आता रेल्वे मंत्रालय मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मुंबई: राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत एकमत झाले. किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तरी लोकल सेवा सुरु करावी, असे बैठकीत निश्चित झाले. त्यानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत. यावेळी ते मुंबईची लाईफलाईन सुरु करण्याची विनंती रेल्वेमंत्र्यांना करतील.
मुंबईतील लोकल ट्रेन बंदच ठेवा- रामदास आठवले
याशिवाय, बैठकीत लॉकडाऊन संपल्यानंतर काय करायचे यासंदर्भातही चर्चा झाली. लॉकडाऊन कसा शिथील करता येईल, यावर बैठकीमध्ये बराच खल सुरु होता. येत्या ३१ तारखेला लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे. त्यामुळे आता लवकरच राज्य सरकारकडून नव्या सूचना जारी केल्या जाऊ शकतात.
दरम्यान, आता रेल्वे मंत्रालय मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने १ जुनपासून प्रत्येक दिवशी २०० लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीट आरक्षणालाही शुक्रवारपासून सुरुवात झाली. या सर्व गाड्या बिगरवातानुकूलित (नॉन एसी) असतील. तर सध्या राजधानी मार्गावर फक्त वातानुकूलित एक्स्प्रेस चालवल्या जात आहेत.
सध्याच्या घडीला मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने दिवसाला १५०० पेक्षा नव्या रुग्णांची नोंद होत आहे. नजीकच्या काळात हा आकडा आणखी वाढेल, अशी भीती आहे. त्यामुळे मुंबईत लोकल सेवा सुरु करणे, कितपत योग्य ठरेल, हा प्रश्नच आहे.