आता जे विकेल ते पिकेल आणि हमीभाव नाही तर हमखास भाव : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणा
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करताना अनेक महत्त्वाच्या विषयांवर विधान केले. शेतकऱ्यांसाठी देखील सरकारने येणाऱ्या काळात काही उपाययोजना केल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांत राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, सरकारने कठीण परिस्थितीत २९.५ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले आहे. याचं समाधान आहे. तसेच शेतकऱ्यांकडून विक्रमी कापूस खरेदी केला आहे. मोफत दुध भुकटी कुपोषित बालके आणि आदिवासी महिलांना देत आहोत. खावटी अनुदान योजना सुरु केली असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
निसर्गाच्या लहरीवर शेती पिकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे जे विकेल ते पिकेल अशी मोहीम सुरु करत आहोत. असंघटीत शेतकऱ्यांच्या सोबत सरकार आहे. आता शेतकऱ्यांना हमीभाव नाही तर हमखास भाव देणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
तसेच शिवभोजन थाळी ५ रुपये केली आणि आजपर्यंत पावणे दोन कोटी थाळ्या वितरीत केल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना 700 कोटींची मदत दिली आहे. त्याठिकाणी केंद्रीय पथकाने देखील समाधान व्यक्त केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पूर्व विदर्भात १८ कोटी रुपयांची तातडीची मदत दिली आहे. याठिकाणी सुद्धा कोल्हापूर सांगली प्रमाणे संपुर्णपणे मदत करणार आहोत.