सर्वांनी सहकार्य केल्यास यश येईल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
सर्वांनी सहकार्य केल्यास यश येईलच असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई : विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांनी सहकार्य केल्यास यश येईलच असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे राज ठाकरे तसेच इतर पक्षांच्या प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून सहभागी झाले होते.
आज कोरोनाशी मुकाबला करीत असतांना आपल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळले आहे. माझे आपल्याशी मधून मधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सुचना मी ऐकत असतो, माध्यमांतून वाचत असतो. त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवीत असतो. केंद्र सरकार सुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
परप्रांतीय कामगारांची परत तपासणी केल्यशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये, राज्य स्थलांतरित कायद्याखाली त्यांची नोंदणी करावी. जे कामगार गेले आहेत त्यांच्या ऐवजी त्या नोकऱ्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून द्या अशी सूचना यावेळी राज ठाकरे यांनी केली.
परप्रांतीयांकडून पैसे न घेण्याच्या मागणी बाबत माणुसकी बाजूला ठेवली पाहिजे. या आधी मी भाषणात म्हटलं होतं की संकाटाच्या वेळी परराज्यातील लोक पहिले पळतील. शाळा सुरू कशा करणार? ते पालकांपर्यंत पोहोचवणं, महापालिका, सरकारी कर्मचारी पोलीस , सफाई कर्मचारी यांच्याकडे लक्ष देणे गरचेच असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून काही सुचना केल्या. मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापन ठीक करण्याची गरज आहे असे सांगितले. गंभीर रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे तसेच आजारी पडणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी नियोजन करावे लागेल असे सांगितले.
कोव्हीड नसलेल्या रुग्णांना उपचार मिळणे, रुग्णाना बेड्सची व इतर माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळावी. रुग्णांचे इतर संपर्क मोठ्या प्रमाणावर शोधले पाहिजे तसेच प्रशासनात समन्वय हवा तो घडवून आणणे महत्वाचे आहे असे सांगितले. परराज्यातील २०-२५ हजार श्रमिक पायी घरी निघाल्याचे चित्र आहे,केंद्राला अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत, पोलिसांचे नैतिक बळ वाढवावे, त्यांच्यातही कोरोना वाढतोय, त्यांना पुरेसे संरक्षण मिळावे असे ते म्हणाले.
पालघर रेड झोन मध्ये आहेत पण याठिकाणी आदिवासी भाग आहे त्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. बांधकामे बंद आहेत. पावसाला सुरुवात झाली तर सिमेंटचा साठा खराब होईल. सकाळ, संध्याकाळ लोकल ट्रेन्स काही प्रमाणात तरी सुरु झाल्या पाहिजेत राज्य शासनाचे काम चांगले सुरु असल्याचे बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले.