गाढवाने लाथ मारण्याआधीच लाथ मारली, उद्धव ठाकरे यांची भाजपवर जहरी टीका
शिवसेनेच्या मुंबई बीकेसी येथील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हिंदुत्व, हनुमान चालीसा, नवनीत राणा, राज ठाकरे, भोंगे, भाजपकडून वारंवार होणारी टीका याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या बीकेसी येथील सभेतून उत्तर दिले.
'जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवनों, भगिनीनों आणि मातांनो' अशी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे महाराष्ट्रात राहून कळलेलं नाही त्यांच्यासाठी बोलावं लागतं. खोटा हिंदुत्त्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता. ते देशाची दिशा भरकवटत आहेत. मी मागे बोललो होतो, जे शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला शिकवलं होतं. ते म्हणाले होते, की मला मंदिरात घंटा बडवणारा हिंदु नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदु पाहिजे. तोच धागा घेऊन आपण पुढे जात आहोत.
आमचं हिंदुत्व गदाधारी आहे आणि बाकिच्यांचं घंटाधारी आहे, बसा हलवत घंटा. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, यांचं हिंदुत्व हे गदाधारी नाही गधाधारी आहे. बरोबर आहे आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं.
आमचे काही जुने फोटो तुमच्याबरोबर येत आहेत, त्यामुळे गैरसमज झाला असेल की आमचं हिंदुत्व हे गधाधारी आहे, पण ते आम्ही सोडून दिलं आहे. कारण उपयोग नाही. शेवटी गाढव ते गाढव.
त्यामुळे आमच्यासोबत जी गाढवं होती घोड्याच्या आवेशात त्यांना आम्ही लाथ मारली. त्या गाढवांनी लाथ मारण्याआधी आम्ही त्यांना लाथ मारून बाहेर पडलो. गाढव ते गाढवच. गाढवापुढे वाचली गीता. आता बसा काय करायचं ते.
देवेंद्र फडणवीस म्हणतात, हिंदुत्व फक्त भाजपकडे आहे. मग इथे बसलेले कोण आहेत? हे हिंदू नाहीत?
हे जे हिंदु आहेत, यांच्या धमण्यांमध्ये भगवं रक्त शिवसेनाप्रमुखांनी जे त्यावेळेला रुजवलं आहे, हा हिंदु काय मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. कोणाची हिम्मत आहे हिंदुत्वावर बोलण्याची.
१ मे रोजी घेतलेल्या बुस्टर डोस सभेतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका केली होती. त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसी येथील सभेत आपल्या ठाकरी शैलीत उत्तर दिले.