दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील मानापमान नाट्याचे कारण ठरलेल्या मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. मात्र, गृहखात्याकडून करण्यात आलेल्या बहुतांशी अधिकाऱ्यांच्या बदल्या जैसे थे राहिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामधून काय साधले, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्र्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्यानेच वरचष्मा राखल्याचे आता स्पष्ट झाले आहे. २ जुलै रोजी गृहखात्याकडून मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, आपल्याला विश्वासात न घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही तासांमध्ये या बदल्या रद्द केल्या होत्या. परंतु, आता नव्या आदेशावर नजर टाकल्यास तीन उपायुक्तांच्या बदल्या फक्त वेगळ्या ठिकाणी करण्यात आल्या आहेत, तर संग्रामसिंह निशाणदार यांची बदली रद्द करण्यात आली आहे. उर्वरित सहा उपायुक्तांना पूर्वीच्याच ठिकाणी बदली मिळाली आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या मानापमान नाट्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय साधले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, आपणच महाविकासआघाडी सरकारचे प्रमुख आहोत, हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही कृती केली होती. आपल्याला विश्वासात न घेता केलेल्या बदल्या, अथवा घेतलेले निर्णय खपवून घेतले जाणार नाही हा संदेश मुख्यमंत्र्यांना द्यायचा होता, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 


पोलीस उपायुक्तांच्या बदल्या खालीलप्रमाणे:


* प्रसन्नजित दहिया यांची झोन 1 ला झालेली बदली रद्द करून त्यांची बदली झोन ३ ला करण्यात आली आहे
* प्रशांत कदम यांची झोन ७ ला झालेली बदली कायम ठेवण्यात आली आहे
* गणेश शिंदे यांची पोर्ट झोनला झालेली बदली कायम ठेवण्यात आली आहे
* रश्मी करंदीकर यांची सायबर सेलला झालेली बदली कायम ठेवली आहे
* शहाजी उमप यांची SB 1 ला झालेली बदली कायम ठेवण्यात आली आहे
* मोहन दहिकर यांची CB डिटेक्शनला झालेली बदली रद्द करून त्यांची बदली  LA ताडदेवला करण्यात आली आहे
* विशाल ठाकूर यांची झोन ९ ला झालेली बदली कायम ठेवण्यात आली आहे 
* प्रणय अशोक यांची झोन ५ ला झालेली बदली कायम ठेवण्यात आली आहे 
* नंदकुमार ठाकूर यांची HQ 1 ला  करण्यात आलेली बदली रद्द करून CB डिटेक्शनला करण्यात आली आहे 
* तर संग्रामसिंह निशाणदार यांची झालेली बदलीही रद्द करून पूर्वीच्या झोन १ ला त्यांना कायम ठेवण्यात आले आहे