मुख्यमंत्र्यांकडून आदिती तटकरेंवर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी
आता आदिती तटकरे यांच्याकडे तब्बल आठ खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी आदिती तटकरे यांच्याकडे उद्योग, खनिकर्म, क्रीडा व युवक कल्याण, पर्यटन, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाचा कारभार देण्यात आला होता. यानंतर आज त्यांच्याकडे विधी व न्याय या आणखी एका खात्याचे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून रविवारी याबाबतचे पत्रक जारी करण्यात आले. त्यामुळे आता आदिती तटकरे यांच्याकडे तब्बल आठ खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे.
आदिती तटकरे या माजी मंत्री आणि राष्ट्रावादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. त्या प्रथमच सभागृहात पोहोचल्या असून पहिल्या झटक्यात त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात केवळ तीन महिलांना स्थान देण्यात आले होते. आदिती तटकरे त्यापैकी एक आहेत. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी अल्पावधीतच आपल्या कामाने मुख्यमंत्र्यांचा विश्वास संपादन केल्याने त्यांच्याकडे अतिरिक्त खात्याचा कारभार देण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे कोकणात शिवसेनेचा वरचष्मा असूनही रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना देण्यात आले होते.