मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज होणार होता. परंतु अनेकांच्या नाराजीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे राजकीय वाद रंगला होता. अखेर आजचा हा पायाभरणी सोहळा रद्द करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. आज दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. पण आता यावरुन राजकारण करु नये असं आवाहन मुख्यमंत्री यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


'एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश दिले आहेत.' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती. अजित पवार पुण्यात असताना त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. ज्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची काल संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती.