मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी संवाद साधला. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी जनतेचं लक्ष हे लॉकडाऊन वाढवणार का? याकडे होतं. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूबाबात महत्वाचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आता पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लॉकडाउन लागू केलंय. पण कोरोनानं त्या ठिकाणी आपलं रूप बदलल्याची माहिती माझ्या समोर आली आहे. नवा विषाणू हा कोरोनापेक्षा अधिक झपाट्यानं पसरतोय. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी अनेकदा गर्दी होत असते. त्या ठिकाणी आता पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून आपल्यालाही काही गोष्टी शिकणं आवश्यक आहे.


अनेकांनी मला सांगितलं की ज्या चाचण्या करताय त्या आता कमी करा. जे सुरूवातीच्या काळात झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चाचण्या करतोय. बाहेरून येणाऱ्या लोकांना जर संसर्ग झाला असेल तर त्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा राज्यात संसर्ग वाढू द्यायचा नाहीये. पुन्हा लॉकडाउन नाईट कर्फ्यू करण्याची गरज नाही असं मला वाटतं. आपण अनुभवातून शिकलोय, त्यामुळे राज्यात लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू होणार नाही. 


लॉकडाउनच्या काळानंतर आता गर्दी वाढू लागल्याने थंडीचे आजार काही प्रमाणात दिसू लागले आहेत. या सर्वांवर औषधं जरी असली तरी प्रतिबंधात्मक इलाज जो कोविडसाठी आहे तोच आहे. मास्क लावा, हात धुवा व सुरक्षित अंतर ठेवा. हे जर आपण कटाक्षाने पाळलं, तर कोविडचं काय इतर कोणतेही साथीचे आजार, आपण जर त्यांच्यापासून अंतर ठेवलं तर तेही आपल्यापासून अंतर ठेवतील.



आपल्या देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काल सांगितलं की, करोनावरील लस आली तरी मास्क तुम्हाला लावावा लागणार आहे. म्हणजेच लस आतापर्यंत आलेली नाही परंतु लस येईल तेव्हा येईल, आल्यानंतर आपल्या पर्यंत पोहचेल तेव्हा पोहचेल. परंतु ते घेतलं तरी मास्क लावणं हे बंधनकारक माझ्या मते किमान पुढील सहा महिने तरी आहेच, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.