लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण..., मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुख्यमंत्र्यांच्या कडक निर्बंध लावण्याच्या सूचना
मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना राज्य सरकारने आता कडक पाऊल उचलण्याच्या दिशेने निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
धोका टळला नाही उलट वाढला
ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेनेही लक्षात घेण्याची गरज आहे.
रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कडक निर्बंधांचे संकेत
जनतेनेही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतु डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत.
नियमांचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
लसीकरणाचा वेग वाढवा
लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा नवीन विषाणु आणि औषोधोपचाराची पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे
कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्निसुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा व पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी. व्हेंटिलेटर्सची, आय.सी.यु व ऑक्सीजन बेडसची संख्या वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खुप वाढवले आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार स्वॅबचे संकलन होत आहे. संपूर्ण राज्यात ही टेस्टींगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.