मुंबई : राज्यात एनआरसी लागू होणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. एनआरसी अंतर्गत केवळ मुस्लिमांनाच नव्हे, तर हिंदूंना देखील नागरिकत्व सिद्ध करणं कठीण होईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच मुलाखतीत नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. सीएएमुळे कुणाच्याही नागरिकत्वाला धक्का लागत नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. ही संपूर्ण मुलाखत सोमवारच्या सामनामध्ये प्रकाशित होणार असून सामना लाइव्ह वेबसाइटच्या माध्यमातून ती झी २४ तासवरही पाहायला मिळणार आहे.



तर, महाराष्ट्रात एनआरसीच नव्हे, तर सीएए देखील लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी मांडली आहे.


तर आमच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचं वक्तव्य उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलंय. तर भाजप प्रवक्ते राम कदम यांनी तुम्ही चारही धर्मांच्या विरोधात आहात का असा सवाल केला आहे.


दरम्यान, सीएए, एनपीआर, एनआरसीविरोधात देशभरात अनेक आंदोलनं झाली. जिल्ह्याच्या, तालुक्याच्या काही ठिकाणी अजूनही आंदोलनं सुरू आहेत. मात्र आता ग्रामपंचायतीमध्येही या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पडसाद उमटू लागलेत. अहमदनगर जिल्ह्यातील इसळक या दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावाने ग्रामपंचायतीत एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडला आहे. अशा प्रकारचा ठराव मांडणारी ही देशातली पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.