मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या बाहेर पडतच नाहीत. ते अनेक दिवस मंत्रालयात फिरकलेच नाहीत. त्यामुळे प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचा  वचक राहिलेला नाही, या विरोधकांच्या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते शनिवारी दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, गेल्या काही महिन्यांत मी मंत्रालयात कमीतकमी गेलो या आरोपात काही दम नाही. सध्या तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. या तंत्रज्ञानाचा तुम्हाला फायदा करुन घेता येत नसेल तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच आहात. मी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घरबसल्या सगळीकडे जाऊ शकतो. त्यामुळे एकाचवेळी संपूर्ण राज्यावर लक्ष ठेवता येते. मुख्य म्हणजे निर्णय ताबडतोब घेता येतात. मी फिरत नाही. घरी बसतो म्हणून अभ्यास होतो. अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं यात तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 


सरकारमध्ये तीन-चार मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद- राणे

फिरणं आवश्यक आहे. मी त्यासाठी नाही म्हणत नाही. पण सगळीकडे फिरायचे म्हटले तर तुम्हाला मर्यादा येतात. तुम्हाला एकाच ठिकाणी जाता येते. पण व्हीडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करून तुम्हाला सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचतो आणि सरकारी यंत्रणेवरील ताणही कमी होतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

तसेच या मुद्द्यावरून आरोप करणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरे यांनी टोलाही लगावला. मी राज्यात फिरत नाही, असा आरोप करणाऱ्यांना मी एक सवाल विचारु इच्छितो. तुम्ही विमानाने का प्रवास करता? बैलगाडीतून का जात नाही? बैलगाडीतून जा, पायी जा. तंत्रज्ञानाचा उपयोग करणार नसाल तर मग त्याचा शोध लावता कशाला, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.