मुंबई : सोमवारी सकाळच्या सुमारास मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. इतकंच नव्हे तर सदर घटनेची चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळालं. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळं काही काळासाठी जनजीवन विस्कळीत झालं. सर्वसामान्यांना काही अडचणींचाही सामना करावा लागला. परिणामी भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 


मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत, तसंच यासाठी कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, सकाळच्या वेळेत रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी ज्यामुळं कोणतीही अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. 


 


वीज पुरवठा खंडित झालेल्या काळात काही अपघात होणार नाहीत यादृष्टीनं नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावं आणि तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव आणि मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितलं होतं.