मुंबई: महाराष्ट्रातील नेत्यांनी संकटाच्या काळात राजकारण करु नये, असे सांगत राज्यातील भाजप नेत्यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या देणाऱ्या नितीन गडकरींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हदरम्यान बोलताना गडकरी यांचा उल्लेख केला. मी नितीन गडकरी यांना धन्यवाद देऊ इच्छितो. कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात अनेकजण जातपात, धर्म, पंथ बाजूला ठेवून लढाईत उतरलेत. मीदेखील तसा प्रयत्न करत आहे. मात्र, आताही आपण राजकारणच करत बसलो तर आपल्याला दुसऱ्या शत्रूची गरज नाही. निवडणुका येतात, जातात. सत्ताही आज आहे उद्या नसेल. पण आता जीव गेला तर तो परत येणार नाही. त्यामुळे किमान आतातरी राजकारण करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या केंद्र आणि राज्य सरकार एकोप्याने काम करत आहेत. मात्र, काहीजण राजकारणात मग्न आहेत. त्यांना जे करायचे ते करु द्या. मात्र, तुम्ही सगळ्यांना महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभा राहण्याचा सल्ला दिला. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तसेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदीतही गडकरी यांचे आभार मानले.

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाविषयी नापसंती व्यक्त केली होती. कोरोनाच्या संकटामुळे देशातील गरीब जनता अडचणीत सापडली आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये. 

मलादेखील अनेकदा महाराष्ट्र सरकारच्या काही बाबी पटत नाहीत. तेव्हा मी थेट मुख्यमंत्री किंवा सचिवांशी चर्चा करतो. चुका सगळ्यांकडून होतात, अशावेळी चर्चा करुन मार्ग काढायचा असतो. एकमेकांवर जाहीर टीका करून वाद निर्माण करणे टाळायला पाहिजे. अमेरिकेत ९\११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय पक्ष आपापसातील वाद बाजूला ठेवून एकत्र आले होते. त्यामुळे आपणही कोरोनासारख्या संकटाच्या काळात राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. आपला राजकीय डमरू वाजवण्याची ही वेळ नाही. एकदा हे संकट सरल्यानंतर आपण पुन्हा राजकारण करायला मोकळे आहोत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले होते.