मुंबई : भाजपच्या माजी मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी फेसबूकवर पोस्ट करत १२ डिसेंबरला भेटू आणि बोलू असे म्हटले. त्या एवढ्यावर न थांबता आपल्या सोशल  अकाऊंटवरुन आपली भाजपसंदर्भातली ओळखही काढून टाकली. त्यामुळे चर्चेत अधिक भर पडली. त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, ही चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांची ट्विट रिट्विट केले. त्यामुळे राजकीय चर्चेत अधिक भर पडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांच्या टि्वटला प्रतिसाद दित त्यांचे आभार मानले आहेत. तीन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी टि्वट करुन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. ‘राज्याचे हित प्रथम’ ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा असल्याचे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानताना महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल, असे आपल्या टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे.



पंकजा मुंडे भाजप रामराम करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंचे आभार मानणार टि्वट केले आहे. आधीच भाजपनेते पंकजा या पक्ष सोडणार नाहीत. त्या पक्षात कार्यरत राहतील, असे स्पष्टीकरण देत आहेत. त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे या भाजपच्या महत्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करत त्या मंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या आहेत. भाजपच्या नेत्यांचे पंकजा मुंडेंशी बोलणे आहे. त्या भाजपची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबायला हव्यात, असे म्हणाले.


त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव यांनी त्यांचे ट्विट केल्याने चर्चा पुन्हा रंगली आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार अशी चर्चा सध्या समाजमाध्यम आणि राजकीय वर्तुळात आहे. याबाबत पंकजा मुंडे यांनी काहीही भाष्य केलेले नाही. त्या १२ डिसेंबरला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर त्यांची पुढची भूमिका ठरणार आहेत. तोपर्यंत राजकीय वर्तुळात चर्चा सुरुच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.