मुंबई : भोंग्यांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही, हे खेळाडू कोणत्या कोणत्या मैदानात कोणते कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलंय. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ करणारे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्हाला हिंदुत्वाचा डंका वाजवण्याची गरजही नाही,  असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तर रोज झेंडे का बदलावे लागतायत? असा टोला राज ठाकरेंना लगावला...


'बाळासाहेब भोळे होते, मी नाही'
आरोप केला जात आहे की ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, बरोबर आहे, बाळासाहेब ठाकरे भोळे होते. बाळासाहेबांना तुम्ही वेळोवेळी कसे फसवत गेलात हे माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. म्हणून तुमच्याबरोबर थोडा धुर्तपणाने वागतोय. मी नाही भोळा, माझे वडिल भोळे होते, माझ्या रक्तात हिंदुत्व त्यांनीच भिनवलं आहे. 


पण हिंदुत्वाच्या आडून तुम्ही डाव साधत होतात याकडे ते कानाडोळा करत होते, पण मी नाही करणार, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आपण भाजपशी धूर्तपणानंच वागणार, असं मुख्यमंत्री म्हणालेत. लोकसत्तेला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे. 


कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, हा प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारण्याची गरज आहे. आम्ही जर का वाईट करत असू तर आम्हाला जरूर महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडे पाडा, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीबाबत विचारत असाल तर कुठे नेऊन ठेवालाय महाराष्ट्र, कोणती संस्कृती आहे, ही सूडबुद्धी कुठून आली, कशी आली तुमच्या रक्तात, विकृतपणा तुमच्यात आला कसा. हे विकृत, सडलेलं, नासकं राजकारण आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. आणि हे महाराष्ट्र कधीच मान्य करणार नाही. त्यामुळे  निवडणुकीत लोकं त्याचा फैसला करतील, पण सडकं, नासकं राजकारण कराल, तर लोकच यांना विचारलीत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला आहे. 


हा साधू, संत, शिवरायांचा महाराष्ट्र नाहीए, हे असं राजकारण महाराष्ट्राला अपेक्षित नाहीए, ते सुद्धा कशासाठी केवळ मला पाहिजे यासाठी असा आरोप मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केला आहे. 


पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात
मोदी हटाव मोहिमेच्यावेळी बाळासाहेब उभे राहिले.  माझं आणि त्यांचं एक नातं आहे. मनात ओलावा जरूर आहे. म्हणजे लगेच युती होईल का? असं नाही.  महाराष्ट्राला अनपेक्षित बोल लावल्यानं मी उत्तर दिलं. लोकांचा गैरसमज होऊ नये हा उद्देश होता. आम्ही तीन पक्षांचं सरकार केलं, लोक निवडणुकीत ठरवतील योग्य की अयोग्य. 


तोपर्यंत सरकार पाडण्याचा आटापिटा करू नका, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तुम्ही पक्षाचे पंतप्रधान नाहीत, देशाचे आहात. चीनला एकतरी दणका देऊ शकलो का, तोंडी लावायला पाकिस्तानला घेऊन बसता. काही झालं तरी पाकिस्तानचं चाटण चाटत बसता. कधीतरी चीनला दम देऊन दाखवा, असंही ते म्हणाले.