मुंबई : मुंबईसह राज्यभरातील अनेक भागांमध्ये सर्दी, खोकल्याने लोकांना हैराण केलंय. मुंबई परिसरात थंडीची लाट कमी होत असली तरी खोकल्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. वातावरणातील बदलामुळं सर्दी, खोकल्यासारखे आजार फैलावत असून या आजारांचा मुक्कामही अधिक काळ राहत असल्याने रूग्ण हैराण झालेत.


सर्दी, खोकल्याचे रुग्णात वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थंडीचे कमी-अधिक होत असलेले प्रमाण, कधी धुके तर कधी ढगाळ वातावरण. अशा बदलत्या हवामानामुळं रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढताना दिसतायत. गेल्या १५ दिवसांपासून मुंबईकरांना तर खोकल्याने हैराण करुन सोडले आहे. 


अनेक कामांमुळे हवेत धूळीकण


जागोजागी सुरु असलेली मेट्रोची, रस्त्यांची कामे, इमारत बांधकाम यामुळं अगोदरच मुंबईत धुळीचे प्रमाण अधिक आहे, त्यातच गारव्यामुळं हे धकण वातावरणाच्या खालच्या स्तरात राहत असल्याने या आजारांना निमंत्रण मिळत आहे. 


थंडीमुळं निर्माण झालेला कमी दाब खोकल्याचे जंतू पसरवण्यास पोषक ठरत आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने लहान मुले आणि वृद्ध लोकांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.


आजार डॉक्टरांना दाखवणे गरजेचे


डोकेदुखी, सर्दी बरोबरच घसा खवखवणे, आवाज बसणे, घसा दुखणे यासारखा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. हा खोकला 10-12 दिवसांपेक्षा अधिक असा दिर्घकाळ टिकून राहत आहे. यासाठी घरगुती उपचार न करता तात्काळ डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.


गरम पाणी प्या


सर्दी, खोकल्याला दूर ठेवण्यासाठी काही पथ्येही पाळणं गरेजेचे आहे. थंड पेय किंवा पदार्थ खावू नयेत. रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळावे. खोकताना- शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. गरम पाणी पिण्यासाठी वापरावे.  'क' जीवनसत्वयुक्त फळांचा समावेश आहारात करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.


 दुर्लक्ष करु नका, अन्यथा...


किरकोळ आजार आहे म्हणून बहुतांशजण सर्दी, खोकल्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु या आजारांकडं दीर्घकाळ दुर्लक्ष करणे काहीवेळा जीवावरही बेतू शकते. त्यामुळं या आजारांबाबत जागरूक असणं आवश्यक आहे.