पालिका हॉस्पिटलमध्ये डोळ्याला उंंदराने चावा घेतल्याचा दावा केलेल्या रूग्णाचा मृत्यू
जोगेश्वरीतील मुंबई महानगरपालिकेच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या डोळ्याला उंदराने चावा घेतल्याचा दावा रूग्णाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता.
मुंबई : जोगेश्वरीतील मुंबई महानगरपालिकेच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या डोळ्याला उंदराने चावा घेतल्याचा दावा रूग्णाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. आता या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी आयसीयूमधून या रूग्णाला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे.
कुटुंबीयांचा दावा
कोमामध्ये असलेल्या 27 वर्षीय रूग्णाला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र खर्च हाताबाहेर जात असल्याने त्यांनी रुग्णाला जोगेश्वरीच्या पालिका हॉस्पिटलमध्ये हलवले होते.
जनरल वॉर्डमध्ये काही दिवसांपूर्वी उंदीर पाहिल्याचं रूग्णाच्या परिवाराने सांगितले आहे. अचानक रुग्णाच्या उजव्या डोळ्याजवळ आम्ही रक्त पाहिलं. मात्र रूग्णाला उंदराने चावा घेतल्याचा कोणताच पुरावा नाही.
मेंदूवर शस्त्रक्रिया
27 वर्षीय रूग्ण गेले दोन महिने कोमामध्ये होता. शस्त्रक्रियेच्या मदतीने मेंदूतील क्लॉट्स काढण्यात आले. कोमामध्ये असलेल्या रूग्णावर 8 मार्चला शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.