मुंबई: आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना सध्या प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. कारण, कोकणात जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या जादा रेल्वे आणि एसटीच्या वेळापत्रकाचे पूर्णपणे तीनतेरा वाजले आहेत. यामध्ये वाहतूक कोंडींची भर पडल्याने सध्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सवाच्या जादा रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक साफ कोलमडले आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस तब्बल अडीच तास उशिराने धावत आहे. तर तुतारी एक्स्प्रेस एक तास २३ मिनिटे, पनवेल सावंतवाडी तब्बल साडेतीन तास, पनवेल-थिविम गणपती स्पेशल, दुरांतो एक्प्रेस दोन तास आणि कुर्ला-सावंतवाडी गणपती स्पेशल दोन तास उशिराने धावत आहे. 


तर दुसरीकडे रस्तेमार्गाने कोकणात निघालेल्या चाकरमन्यांनाही अशाच हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे. एसटी प्रशासनाने कोकणात जाण्यासाठी विशेष बसेस सोडल्या असल्या तरी वाहतूक कोंडी आणि पावसामुळे वेळापत्रक कोलमडले आहे. तसेच अनेक बसेसमध्ये बिघाड झाल्याने त्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे कोकणातून परतणाऱ्यांना गाड्यांना मोठा विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशांना बस स्थानकात ताटकळत राहण्याची वेळ आली आहे.


गणेशोत्‍सवासाठी निघालेल्या बसला आग; प्रवासी थो़डक्यात बचावले


याशिवाय, मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळी एसटी बसला अचानक आग लागल्याचा प्रकार घडला. लोणेरेजवळ वडपाले येथे ही आगीची घटना घडली. मुंबईहून सावर्डे येथून एसटी बस निघाली होती. बसमध्ये ६० प्रवासी होते. चालकाने वेळीच गाडी थांबवून प्रवाशांना उतरवल्यामुळे ६० प्रवाशांचा जीव वाचला. अपघातानंतर मात्र महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.