मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरुन राजकारण आणखी जोरात सुरु झाले आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. या तक्रारीसंदर्भातलं निवेदन गृहमंत्रालयाने सीबीआयकडे दिले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तर दुसरीकडे सुशांत मृत्यूशी भाजप कनेक्शनच्या चौकशीची मागणीही काँग्रेसने लावून धरली आहे. या सगळ्याला भाजपनंही उत्तर दिले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात महाआघाडी सरकारवर विरोधक सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. पण आता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजपचे कनेक्शन काय, असा सवाल करत काँग्रेसने हल्लाबोल करायला सुरुवात केलीय. भाजप कनेक्शनच्या चौकशीची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी लावून धरली आहे. 



दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही मीडियाला माहिती दिली. आज आणि काल मला अनेक निवेदने मिळाली आहेत. नरेंद्र मोदी यांच्यावर २७ भाषेत चित्रपट करणार्‍या संदीप सिंह याचे भाजपशी काय संबंध आहेत, तसेच संदीप सिंहचे संबंध बॉलिवूड आणि फिल्म इंडस्ट्रीशी काय आहेत त्याची चौकशी करावी अशी ती निवेदने आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.


दरम्यान, सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. मी ही निवेदने सीबीआयकडे पुढील कारवाईसाठी पाठवली आहेत. आपल्याला कल्पना आहे की भाजपचे अनेक नेत्यांचा बॉलिवूडशी जवळचा संबंध आहे, त्यांचे पाच वर्ष सरकार होते. त्यांनी त्यावेळी याबाबतीत काय केले, हा पण एक मोठा प्रश्न आहे, असा टोला गृहमंत्री देशमुख यांनी भाजपला लगावला आहे.


तर दुसरीकडे, संदीप एस. सिंह लंडनला पळून जाणार, अशी बातमी होती. त्यामुळे १ सप्टेंबर ते २३ डिसेंबर २०१९ या काळात त्यानं भाजप ऑफिसला ५३ फोन केलेत. भाजप कार्यालयात तो नेमका कुणाशी बोलत होता?, भाजपमधील त्याचा आश्रयदाता कोण होता?, ड्रगमाफियांचा भाजपशी काही संबंध आहे का, आदी सवाल काँग्रेसने उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीच हे आरोप केले आहेत. विनाकारण भाजपला ओढू नका, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या या आरोपांवर आम्हाला विनाकारण यामध्ये ओढू नका, असं भाजपनं म्हटले आहे.


दरम्यान, संदीप सिंह हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच्या चित्रपटाचा निर्माता आहे. गुजारात सरकारनं त्याच्याशी एका चित्रपटासाठी काही कोटींचा करार केल्याचं बोललं जातं. इतके दिवस सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरुन भाजपच्या निशाण्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी होतं. पण आता मदतीला आलेल्या काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यामुळे पुढच्या काळात हा आमने-सामने सामना आणखी रंगणार आहे.