मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसने नवी प्रचार मोहीम सुरू केली आहे.  शिवसेना-भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत 'क्या हुआ तेरा वादा?' या टँगलाईनच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला जातोय. दक्षिण मध्य मुंबईतून या प्रचार मोहिमेला सुरूवात झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील मतदानाची तारीख २९ एप्रिल असली तरी प्रचारात आता जोर भरू लागलाय. मुंबई काँग्रेस प्रचारात आघाडी घेण्यासाठी सत्ताधारी भाजप-शिवसेनेला गेल्या पाच वर्षातील कामाचा हिशोब विचारत आहे. दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ? हे विचारण्यासाठी 'क्या हुआ तेरा वादा?' ही टँगलाईन घेवून मुंबई काँग्रेस प्रचारात उतरलीय. निवडणुकीपूर्वी दिलेली कुठलीच आश्वासने भाजप-शिवसेनेने पूर्ण केली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला. 


तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेकडूनही टेलिव्हिजनवरील जाहिरातींवर भर दिला जातोय. मुंबईत अनेक ठिकाणी चालत्या स्क्रीन्सच्या माध्यमातून मोदींची भाषणे दाखवली जात आहेत. यामध्ये मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी अधोरेखित करण्यात आली आहे. जेणेकरून सामान्य लोकांना मोदींविषयी आपलेपणा वाटेल, असा भाजपचा प्रयत्न आहे. तसेच नुकत्याच येऊन गेलेल्या 'गली बॉय' या बॉलिवूड चित्रपटातील 'अपना टाईम आएगा' या गाण्याचे मोदी व्हर्जनही मुंबईत ऐकायला मिळत आहे. त्यामुळे एकूण सर्वच राजकीय पक्ष आपल्या प्रचारात वेगळेपण राहील, याची पूरेपूर काळजी घेत आहेत.