मुंबई : विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरला. अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा गाजला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गंभीर आरोप केले आहेत. 2016-17मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला होता, आणि माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी सभागृहात केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझा फोन नंबर ‘अमजद खान’ नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली. माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा असल्याचंह नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 


हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करायचा होता का?


फोन टॅप करण्यासाठी मुस्लिम धर्माचं नाव देण्यात आलं. या पद्धतीने हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करुन धर्माच्या नावाने पुन्हा राजकारण करण्याचा उद्देश या मागे होता का? फोन टॅपिंगमागचा मुख्य सूत्रधार शोधून काढा असे सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केले.


तुमचा देशमुख करु, भुजबळ करु!


“काल सभागृहात भास्कर जाधव यांना धमकी देण्यात आली की तुम्ही बोललात तर तुमचाही अनिल देशमुख करून टाकू. बाहेर सांगतात भुजबळ करून टाकू. अशी धमकी या सभागृहात कशी दिली जाते? हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असं नाना पटोले म्हणाले.


फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी


भाजप सरकारच्या काळात झालेलं फोन टॅपिंगचं प्रकरण भाजपला भोवण्याची चिन्हे दिसत आहे. दुसऱ्यांचं नाव देऊन फोन टॅप केला असेल तर ते गंभीर आहे, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल. तसंच आगामी अधिवेशनापर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.