कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या मानखुर्द-शिवाजीनगरच्या वॉर्ड क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत शिवसेनेत सपत्नीक प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकरे दांपत्याला शिवबंधन बांधले. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  पक्ष प्रवेशावेळी  शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार राहुल शेवाळे, विभागप्रमुख राजेंद्र राऊत उपस्थित होते. विठ्ठल लोकरे यांना मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवारी देण्याची शक्यता असून यासाठीच त्यांचा प्रवेश घडवून आणल्याचे बोललं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानखुर्द परिसरातून 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले विठ्ठल लोकरे यांनी 90 च्या दशकात शिवसेना शाखाप्रमुख म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. सुमारे 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा लोकरे शिवसेनेत येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. शनिवारी विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 


सोमवारी सकाळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मुंबई महानगरपालिका मुख्यालयात जाऊन, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह विठ्ठल लोकरे आणि माजी नगरसेविका सुनंदा विठ्ठल लोकरे मातोश्रीवर दाखल झाले. 



पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून आणि भगवा झेंडा हाती देऊन लोकरे दांपत्याचे शिवसेनेत स्वागत करत शुभाशीर्वाद दिले. "तुम्हा सगळ्यांच्या साथीने विठ्ठलाला शिवसेनेत प्रवेश देतोय, त्याच्या पाठीशी उभे रहा" असे भावनिक आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.


मानखुर्द-शिवाजी नगर परिसराचा कायापालट करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, याची जाणीव झाली. मुंबई महानगरपालिका, राज्य आणि केंद्र या तीनही ठिकाणी शिवसेना- भाजपचे सरकार असल्याने मानखुर्द-शिवाजीनगरचा सर्वांगीण विकास आता शक्य आहे. या परिसरातील जनतेच्या उज्वल भवितव्यासाठी शिवबंधन बांधल्याची प्रतिक्रिया विठ्ठल लोकरे यांनी दिली आहे. 


मानखुर्द- शिवाजी नगर परिसरात, रत्नाकर नारकर यांच्यानंतर शिवसेनेला भगवा झेंडा फडकविता आला नाही. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, विठ्ठल लोकरे यांना आम्ही सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दक्षिण- मध्य मुंबई खासदार राहुल शेवाळे यांनी दिले आहे.