दीपक भातुसे, मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीला गळतीचं ग्रहण लागलं असलं तरी जागावाटपात मात्र आघाडी घेतलीय. दोन्ही पक्षांमध्ये मुंबईत पार पडलेल्या बैठकीत २८८ पैकी २२५ जागांचं वाटप पूर्ण झालंय. आता केवळ ६३ जागांचं वाटप बाकी आहे. यातल्या काही जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. उद्या दिल्लीत काँग्रेसच्या निवड समितीची बैठक आहे. त्यानंतर शिल्लक जागांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 


काँग्रेसच्या २७ उमेदवारांची नावे 'झी २४ तास'च्या हाती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामराजे शिंदे, नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेस विधानसभा निवडणुकीसंदर्भात छाननी समितीने ६० नावे निश्चित केली आहेत. त्यापैकी काँग्रेसच्या २७ उमेदवारांची नावे झी २४ तासच्या हाती लागली आहेत. यात काही विद्यमान आमदारांना समाविष्ट केले आहे तर काही ज्येष्ठ नेत्यांना विधानसभा लढवण्याचा पक्षाने आदेश दिला आहेत. 



यात अशोक चव्हाण हे भोकरमधून लढणार आहेत. तर नवापूरमधून ज्येष्ठ नेते स्वरूपसिंह नाईक निवडणूक लढवणार आहेत. २५ विद्यमान आमदारांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आलाय. काही विद्यमान आमदार भाजप-शिवसेनेत जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांची नावे पहिल्या यादीत घेण्यात आली नाहीत.