मुंबई : काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi Ed Inquiry) ईडीच्या फेऱ्यात अडकल्यात. लागोपाठ तिसऱ्या दिवशी आज त्यांची तब्बल 4 तास चौकशी करण्यात आली. मात्र यामुळं दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलनाचा जोरदार भडका उडालाय. ठिकठिकाणी सोनिया गांधींच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच केंद्र सरकारचा घोषणांमधून निषेध करण्यात आला. (congress follwers agiation in various city against ed due to congress sonia gandhi enquiry)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात सोनिया गांधींची तिस-यांदा आणि लागोपाठ दुस-या दिवशी ईडीकडून चौकशी झाली. तब्बल चार तास ही चौकशी सुरू होती. चार तास ईडी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना सामोरे गेल्यानंतर सोनिया गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या. त्यांच्यासोबत प्रियंका गांधी देखील होत्या.


सोमवारी पहिल्यांदा सोनिया गांधींची ईडी चौकशी झाली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा तब्बल 6 तास सोनियांची चौकशी झाली. त्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही याच प्रकरणात ईडीनं कसून चौकशी केली होती.


काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?


पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1937 मध्ये असोसिएटेड जर्नल लिमिटेड (AJL) कंपनीची स्थापना केली.  या कंपनीच्या वतीनं नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकाशित केलं जातं. कंपनीची मालकी नेहरू घराण्याकडे नव्हती, त्यात अनेक शेअर होल्डर होते.  AJL वरील कर्जाचा बोजा 2008 पर्यंत 90 कोटी रुपयांवर पोहोचला. 


तेव्हा वृत्तपत्र बंद करून कंपनीनं प्रॉपर्टी बिझनेस सुरू केला. AJL चे शेअर्स  2010 मध्ये यंग इंडिया लिमिटेड (YIL) कंपनीत ट्रान्सफर करण्यात आले. नव्या कंपनीत राहुल गांधी, सोनिया गांधींचा हिस्सा 76 टक्के ठेवण्यात आला. यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामींनी केला आणि चौकशी सुरू झाली. 


दरम्यान, गांधी परिवाराला केंद्रीय यंत्रणांकडून जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे... या ईडी कारवाईच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीत मंगळवारी झालेल्या आंदोलनात स्वतः राहुल गांधी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी विजय चौकात ठिय्या मारल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.


संपूर्ण देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. महाराष्ट्रातही काँग्रेस नेत्यांनी जोरदार आंदोलनं केली. नागपुरात तर आंदोलनाला हिंसक वळण लागलं. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार पेटवून दिली. तर दुसऱ्या दिवशीही युवक काँग्रेसचा ईडीविरोधात  आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. यावेळी मोठ्या प्रमाणावर आंदोलकांची धरपकड करण्यात आली.


आधीच काँग्रेस पक्षाची राजकीय पिछेहाट झालीय. त्यात आता ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यानं काँग्रेसची डोकेदुखी आणखीच वाढलीय.