मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी, महासचिव खासदार मल्लिकार्जुन खरगे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झालेत.  या दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जण आणण्याचे प्रयत्न  करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात काँग्रेस कार्यकर्ते त्यांचा जाहीर सत्कार करणार आहेत. या कार्यक्रमात काँग्रेस आपल्या दारी या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ केला जाईल तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील प्रोजेक्ट शक्ती द्वारे काँग्रेस कार्यकर्त्यांची नोंदणी केली जाणार आहे.


पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील पक्षसंघटनेत लक्ष घातले आणि संघटनात्मक फेरबदल केले. राज्याचे नवनियुक्त प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या राज्यातील निवडक नेत्यांची बैठक बोलाविली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पदावर कायम ठेवावे की बदल करावा यावर सध्या खल सुरू आहे. राज्य काँग्रेसमध्ये सध्या शिथिलता आल्याच्या तक्रारी नेत्यांनी केंद्रीय नेत्यांकडे केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्व बदलाचा निर्णय व्यवहार्य ठरेल का, याची चाचपणी केली जात आहे.


काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काही नेत्यांशी राज्यातील संघटनात्मक बाबींबाबत चर्चा केली. तक्रारी आल्यानेच राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांना गेल्या आठवडय़ात बदलण्यात आले. त्यांच्या जागी पक्षाचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.