मुंबई: राज्यातील नागरिकांना १०० युनिट वीज मोफत देण्यावरून महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना येत्या वर्षभरात १०० युनिट वीज मोफत देण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन राऊत यांना फटकारले होते. राज्य सरकारने असले फुकटचे धंदे करू नयेत, असे खडे बोल सुनावले होते. वीजदरावर आकारण्यात येणाऱ्या करात कपात करावयाची झाल्यास राज्य सरकार किती भार सोसू शकते, हे पाहणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असेही अजित पवार यांनी म्हटले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, यानंतर आता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नितीन राऊत यांच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. त्यामुळे मोफत वीज देण्याच्या प्रस्तावावर काँग्रेस पक्ष आग्रही असल्याचे दिसत आहे. नितीन राऊत हे अभ्यास करत आहेत. गरीबांना मोफत वीज देता येईल का, याचा अभ्यास ते करत आहेत. सध्या याची चाचपणी सुरु असून त्यामध्ये काहीच गैर नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. त्यामुळे आता महाविकासआघाडीचे सरकार याबाबत काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.