मुंबई : ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटे वीज बंद ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी देशातील जनतेला केले आहे. या आवाहनावर विरोधकांकडून टीका होत आहे. कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण काय करणार आहोत असा प्रश्न १३२ कोटी जनतेच्या मनात आहे. ८५ हजार लोकांमध्ये एक व्हेंटीलेटर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यावर पंतप्रधानांनी बोलणे अपेक्षित असल्याचे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज डॉक्टर, नर्सेसना कोरोनाची लागणी झालीय. आपल्याकडे अद्ययावत यंत्रणा नाही. याबाबतीत पंतप्रधानांनी बोलाव अशी अपेक्षा होती.


जपान, कोरिया यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन यावर मात केली आहे. आपल्याकडे असे तंत्रज्ञान येण्यासाठी काही उपाययोजना आहेत का ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. 



डॉक्टर्स, नर्सेस यांना सेफ्टी किट्सची कमतरता जाणवत आहे. मास्कचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होतोय. लाखो स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबांची अजूनही उपासमार होत आहे.


कोरोनाशी लढण्याकरिता राज्यांना मदतीची गरज असताना पंतप्रधान दिवे लावण्याचे आवाहन करतायत अशी टीका भाई जगताप यांनी केली. 


दिवे पेटवा इव्हेंट पेक्षा देशाच्या पंतप्रधानांकडून १३२ करोड जनतेला काही आश्वासक उपाययोजनांची अपेक्षा होती.


पंतप्रधानांच्या आवाहनानुसार एक मेणबत्ती ५ रुपयांची असेल तर १३५ करोड जनतेने एक एक मेणबत्ती लावली तर एकूण ६७५ कोटी होतात. तर ३०० रुपयांप्रमाणे२,२५ कोटी एन९५ चे मास्क घेता येऊ शकतील किंवा जे आपले व्हेंटिलेटर, टेस्टिंग लॅब याकरिता हा पैसा उपयोगात आणता येईल असेही जगताप म्हणाले.