मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्दयावरुन ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार टीक केला. राज्य सरकारने मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाजवली जाईल असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेच्या भूमिकेला पाठिंबा देत विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला. त्यातच आता काँग्रेस नेत्यानेच ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. ठाकरे सरकार राज ठाकरे यांना घाबरतं, त्यामुळेच औरंगाबाद सभेत अटीशर्थींचं उल्लंघन केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. 


राज्यात जातीय तणाव भडकवण्यापासून रोखणं आवश्यक असल्याचं सांगत संजय निरुपम यांनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे. तसंच राज ठाकरेंवर कारवाई न केल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.


'महाराष्ट्र पोलिसांनी औरंगाबाद इथल्या सभेसाठी 16 अटी घातल्या होत्या. त्यापैकी 12 अटींचं उल्लंघन केलं आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात दोन न्यायालयांचं अजामीनपात्र वॉरंट आहे. मुंबई पोलीस काहीच का करत नाहीत हे मला समजत नाही. सरकारला राज ठाकरेंची भीती वाटत आहे' असे संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. 


जो कोणी कायद्याला आव्हान देईल त्यांच्यावर कठोर कारवायी केली पाहिजे असंही संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. 


कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे ते म्हणाले. देशात आणि महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे आणि जो कोणी कायद्याला आव्हान देईल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असेही संजय निरुपम म्हणाले.