भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा फिटनेस फंडा, अशोक चव्हाणांचा वॉक, नानांचा पुशअप्सचा सराव
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) दररोज 24 ते 25 किलोमीटर पायी चालतायत. एवढंच नव्हे तर त्या त्या राज्यातल्या नेत्यांनाही ते आपल्यासोबत धावायला लावतात. आता ही यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेड (Nanded) जिल्ह्यातून महाराष्ट्रात (Maharashtra) प्रवेश करणार आहे. त्यामुळेच राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी (Congress Leaders) राहुल गांधींसोबत धावण्याची वेळ आलीच तर अडचण नको म्हणून जोरदार कंबर कसलीय. सर्व प्रमुख नेते फिटनेससाठी कामाला लागले आहेत.
नांदेडमधूनच यात्रेला सुरूवात होणार असल्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर (Ashok Chavan) सर्वाधिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी यात सर्वात आधी पुढाकार घेतलाय. चव्हाण दररोज 5 किलोमीटर वॉकिंगला जातात. तर फिटनेस फंड्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही (Nana Patole) कामाला लागले आहेत. पटोले तर दररोज पुशअप्सचा सराव करत आहेत.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत ते आतापर्यंत शेकडो किलोमीटर चाललेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधींचे फिटनेसचे काही व्हिडीओ (Fitness Video) समोर आलेत. कधी रस्त्यावरच पुशअप्स मारताना राहुल दिसतात तर कधी धावताना दिसतात. बसच्या टपावर कार्यकर्त्यांसोबत चढतानाचा राहुल गांधींचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यामुळेच राहुल यांच्यासोबत पदयात्रेत सामील व्हायचं तर फिटनेस आवश्यक आहे.
राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात 11 दिवस असणार आहे. 7 नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथून या यात्रेला सुरुवात होईल. या यात्रेत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सहभागी होणार आहेत. तसंच वकिल, डॉक्टर, सामाजिक संघटना, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मंडळी या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राहुल गांधी हे नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी मुक्काम करणार आहेत. रोज ज्या ठिकाणी मुक्काम आहे तिथे सभा आणि कॉर्नर मीटिंग होईल. 10 तारखेला नांदेडमध्ये सभा होईल. त्यानंतर नांदेड शहरातील देगलुर नाका येथून पदयात्रेला सुरुवात सुरू होईल, नंतर नवीन मोंढा मैदानावर सभा होईल. त्यानंतर 4 दिवस हिंगोली जिल्ह्यात, हिंगोलीतून वाशिम आणि नंतर अकोला जिल्ह्यात यात्रा पोहोचणार आहे. रोज 24 ते 25 किलोमिटर पदयात्रेचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्र आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेत सामील होणार. शिवाय समविचारी पक्षाचे कार्यकर्ते देखील सामील होणार आहेत. दररोज सकाळी 6 वाजता यात्रेला सुरुवात होणार, सायंकाळी 7 वाजेपर्यंत यात्रा संपणार.