मुंबई :  मोहित कम्बोज भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष आणि बुकी विशाल कारियाचा फोटो व्हायरल होत आहे. कमला मिल आग प्रकरणात कारियाचे नाव आलं होते. क्रिकेट बुकी म्हणून विशाल कारिया याची माहिती आहे. भाजप पदाधिकाऱ्याचे क्रिकेट बुकीशी काय संबंध आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी हे धक्कादायक असल्याचे सांगत कारियाची सर्व माहिती पोलीस आयुक्तांना दिली. मात्र, कारवाई करण्यात आलेली नाही. भाजपचा पदाधिकारीही त्याच्यासोबत हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या विशाल कारियाचा भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहित कम्बोज यांच्याबरोबर काढलेला सेल्फी समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. कारिया क्रिकेट मॅच बुकी तसंच कमला मिल कंपाउंड आग दुर्घटना प्रकरणात त्यावेळी फरार पब मालकांना आश्रय दिल्याचा कारियावर आरोप आहे. 


कारियाच्या घराबाहेर फरार पब मालक आरोपींच्या गाड्या सापडल्या होत्या. ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी कारियाला अटक केली होती. चौकशीनंतर जामिनावर सुटका झाली. वादग्रस्त कारियाचे अनेक सेलिब्रिटी आणि आजी-माजी क्रिकेटपतुंशी मैत्रीपूर्ण संबंध आहे. कम्बोज यांच्याबरोबर काढलेला सेल्फी व्हायरल झाल्यामुळे कारियाचे राजकीय पक्षांच्या नेत्यांशीही असलेले लागेबांधे उघड झालेत.


याबाबत मोहित कंबोज यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, होय, विशाल कारिया यांच्याशी माझी फार पूर्वीपासून मैत्री आहे. ती मी नाकारत नाही. अनके खासगी सोहळ्यांमध्ये आम्ही एकमेकांना भेटत असतो. पण प्रत्येक जण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विशाल कारियाने जर काही बेकायदेशीर कृत्य केलं असेल तर त्याला पोलीस, न्यायव्यवस्था त्याबाबत निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण दिले.