मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तब्बल चार तास झालेल्या चर्चेनंतर महाविकास आघाडीचा सत्तावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीने विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेससाठी सोडले आहे. तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाले आहे. याशिवाय, इतर खात्यांच्या वाटपाबाबतची चर्चाही अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या चर्चेनंतर आता शिवतीर्थावर उद्या पार पडणाऱ्या शपथविधीवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सहा मंत्री शपथ घेतील. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रत्येकी दोन नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. दरम्यान, पक्षनिहाय खातेवाटप हे विश्वासदर्शक ठराव पार पडल्यानंतरच जाहीर करण्यात येईल, असे संकेतही प्रफुल्ल पटेल यांनी दिली. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार अखेर मार्गी लागल्याचे चित्र दिसत आहे. 




तत्पूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना शपथविधीचे निमंत्रण दिले. ही शिवसेना आणि काँग्रेसमधील नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे. या शपथविधीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची उपस्थिती निश्चित मानली जात होती. मात्र, शिवसेनेने काँग्रेससोबतचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी आदित्य ठाकरे यांना दिल्लीला पाठविल्याची चर्चा आहे.