मुंबई : आगामी निवडणुकीसाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाकपच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी ही बैठक झाली. बैठकीला काँग्रेसतर्फे अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी तर भाकपच्या वतीने तुकाराम भस्मे उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचा पराभव करण्यासाठी राज्यातील समविचारी पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादी करते आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सर्व समविचारी पक्षांना बरोबर घेण्याची तयारी करते आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्याने गोरखपूर, फुलपूर आणि कैराना लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणूक त्यांना यश मिळालं. राज्यात तसंच काहीतरी करण्याचा विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आहे. महाराष्ट्रात असा प्रयोग करण्याची सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती.


बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप बहुजन महासंघ, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, लोकभारती अशा पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा त्यांचा विचार आहे. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चार प्रमुख पक्ष आहेत. इतर छोट्या राजकीय पक्षांना सोबत घेऊऩ मतांचं विभाजन होणार नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला (२७.८ टक्के), शिवसेनेला (१९.३ टक्के), काँग्रेसला (१८ टक्के) तर राष्ट्रवादीला १७.२ टक्के मते मिळाली होती. याशिवाय मनसेला ३.७ टक्के तर बसपाला २.३ टक्के मतं मिळाली होती.