मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची पहिली बैठक पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात साडेसात वाजता होणार आहे. शिवसेनेसोबत प्रत्यक्ष चर्चा करण्यापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता असावी, यासाठी ही समिती नेमण्यात आलीये. बैठकीत किमान समान कार्यक्रम आणि सत्ता वाटपाचं सूत्र ठरवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीपूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांनी सिल्व्हर ओक इथं जाऊन शरद पवारांशी चर्चा केली. राष्ट्रवादीकडून कोणते मुद्दे बैठकीत मांडले जावेत, यावर तीन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाल्याची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बोलणी झाली की आम्ही शिवसेनेसोबत बसू आणि तिन्ही पक्ष मिळून चर्चा करू' असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय. आज सायंकाळी ७.३० वाजता मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी जयंत पाटील दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी अर्थात 'सिल्व्हर ओक'वर ही चर्चा पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार हेदेखील बैठकीसाठी पोहचले आहेत.  


दरम्यान, 'अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा म्हणजे युती तुटली असं आम्ही मानतो. सत्तास्थापनेसंबंधी  सेनेसोबत चर्चा झाली आहे' असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलंय. 



महाशिवआघाडीत सत्तेसाठी जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. काँग्रेस नेत्यांची पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. 'ट्रायडंट' हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत तब्बल सव्वा तास चर्चा झाली. या चर्चेसाठी शिवसेनेकडून या बैठकीला मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई उपस्थित होते. तर काँग्रसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे उपस्थित होते. या भेटीमुळे सत्तास्थापनेच्या चर्चेला अधिकृत सुरूवात झाली आहे.