मुंबई: संजय निरूपम यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्याचा वाद ताजा असतानाच रविवारी मुंबई काँग्रेसमध्ये आणखी एक बंडाळी पाहायला मिळाली. संजय निरुपम यांनी आयोजित केलेल्या उत्तर-मध्य मतदारसंघाच्या बैठकीत हा प्रकार घडला. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातून प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. हा निर्णय अनेक कार्यकर्त्यांना न रुचल्याने त्यांनी बैठकीच्या ठिकाणाबाहेर गोंधळ घातला. 


२०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून प्रिया दत्त या मतदारसंघाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. जर त्यांना २०१९ सालची निवडणूक लढवायची होती तर त्यांनी पराभवानंतर मतदारसंघात लक्ष घालून तेथील जनतेची कामे केली पाहिजे होती. प्रिया दत्त यांनी गेल्या साडेचार वर्षात मतदारसंघात मोर्चेबांधणी तर सोडाच पण साधा कार्यकर्त्यांशीही संपर्क ठेवलेला नाही, असे संतप्त कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे आता या मतदारसंघातील उमेदवारीवरून निरुपम विरोधी गट काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.