मुंबई :  पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)  तीन दिवसांच्या मुंबईत दौऱ्यावर आहेत.  राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. ममता बॅनर्जी आपल्या मुंबई दौऱ्यात उद्योगपतींची बैठक घेणार आहेत. तसंच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ममता बॅनर्जी यांनी शहरात दाखल होताच ‘जय मराठा, जय बांगला’चा नारा देत शिवसेनेशी राजकीय सहकार्याचे संकेत दिले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्रायडेंट हॉटेलमध्ये ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर दिली. 


दरम्यान, या भेटीवर प्रश्न उपस्थित करत भाजपने गंभीर आरोप केले आहेत. या बैठकीमागे कटकारस्थान आहे असा आमचा आरोप असल्याचं भाजप नते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. म्हणजे इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास ममता दिदींना शिवसेना मदत करतेय का? इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का? नुकतीच बांग्लादेशीयांवर कारवाई झाली,यापुढे अशी कारवाई न करण्याची हमी इथले सरकारी पक्ष दिदींना देत तर नाही ना? असे प्रश्न भाजपने उपस्थित केले आहेत. 



उद्धव ठाकरे आणि पवार ममता बॅनर्जी यांना महत्व देत आहेत, काँग्रसेला काहीच किंमत नाही असा टोलाही यावेळी आशिष शेलार यांनी लगावला आहे. 


महाराष्ट्रात आलेल्या ममता बॅनर्जी यांचं सरकार जोरदार स्वागत करत आहे, पाहुण्यांचं स्वागत करणं ही परंपराच आहेत, पण काल राजशिष्टाचार, पर्यटन मंत्री आणि ममता बॅनर्जी यांची गुप्त भेट का झाली, असा सवाल उपस्थित करत आशिष शेलार यांनी या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. 


ठाकरे आणि बॅनर्जी हे नाते-नाते खेळतायत का, कौटुंबिक नात्यांचा संबंध काय, असा प्रश्नही आशिष शेलार यांनी विचारला आहे. 


ममता बॅनर्जी या खूप मोठ्या नेत्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असून त्यांनी वाघीणीप्रमाणं लढून लांडग्यांना पळवून लावलं असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. तुमच्या वाघीणीचा प्रचार तिथे जाऊन करावा, वाघीणीला त्रिपुरातून पळवून लावलं, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.