`मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं षडयंत्र, गृहमंत्रालयात प्रेझंटेशन झाल्याचा गौप्यस्फोट`
भाजपच्या प्रमुख लोकांची फाईल करावी लागेल! संजय राऊत यांचा इशारा
मुंबई : राज्यात सध्या शिवसेना संजय राऊत (Sanjay Raut) विरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) असा 'सामना' रंगला आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांतच्या नावावर मोठा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
किरीट सोमय्या आणि त्याच्या काही लोकांचं खुप मोठं षडयंत्र सुरु आहे मुंबई केंद्रशासित करण्याचा. गृहमंत्रालयाने एक प्रेझंटेशन दिलं आहे. भाजपच्या पाच लोकांनी तसं एक प्रेझंटेशन तयार केलं असून किरीट सोमय्या त्याचं नेतृत्व करत आहे. मुंबईतला एक बिल्डर त्यांना मदत करत आहे. जो भाजपाच सर्वात मोठा फायनान्सर आहे असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
मी सोडणार नाही त्याची आणखी १० प्रकरणं आहेत. आज तो चोर दिल्लीला गेलेला आहे तिकडे काहीतरी नौटंकी करणार, कितीही नौटंकी केली तरी तुमचं वस्त्रहरण झालेलं आहे असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
INS विक्रांतच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलेत की नाही हा आमचा प्रश्न आहे. ७११ खोकी भरली आहेत पैशाची, तो पैसा व्हाईट कसा केला हे सुद्धा आहे आमच्याकडे. नौटंकी बंद करा. तुम्ही पैसे पचवून ढेकर दिला आहे. मुंबईत दुर्गंध येतोय त्याचा. या पैशाचा कुठे वापर केला याची सर्व माहिती माझ्याकडे आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजपचे प्रमुख लोकं जर या गैरव्यवहाराचं समर्थ करत असतील तर त्यांची फाईल करावी लागले कश्मीर फाईल प्रमाणेच, ही नविन विक्रांत फाईल आहे. किरीट सोमय्यांचं प्रकरण हे अफजल गुरु आणि कसाब इतकंच भयंकर आहे. देशाच्या सुरक्षेशी खेळलेला हा माणूस आहे. केंद्रातून त्याला सुरक्षा मिळते असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
राज्यसभेमध्ये गृहमंत्री अमित शाहा यांना एक प्रश्न विचारला केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्या दबावाखाली काम करत नाही का आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत नाही का, हे आमच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही सांगा त्यावर ते म्हटले हो डोळ्यात डोळे घालून बोलायला तयार आहे.
तेव्हा मी आमचे फोन टॅपिंग कसे झाले हा मुद्दा मांडला. रश्मी शुक्ला या कोणाच्या ऑर्डरवर काम करत होत्या हे सर्वांना माहित आहे. आजही त्या केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. आम्ही सरकार बनवत असताना आमचे फोन टॅपिंग झाले. हा आमच्या सुरक्षेचा विषय होता. तरीही केंद्र सरकारच्या मदतीने आमचे फोन टॅप झाले. त्यामुळे एखाद्या स्टेटमेंटला जर मला बोलावणार असतील तर तपास यंत्रणांसमोर जायला माझी तयारी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.